Shivraj Sulgude, Drug Inspector

Last modified by Vishal E on 2019/01/11 13:30

Shivraj Subhash Sulgude

Drug Inspector, CDSCO

WhatsApp Image 2018-09-05 at 1.42.30 PM.jpeg

The Show Must Go On..........

लातूर शहर  महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध भारतामधे आपल्या दुष्काळी परिस्थितिमुळे ओळखले जाते. याच लातूर शहरातील एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील माझा जन्म. घरामध्ये कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हती. भविष्यात केवळ शिक्षण हीच आपली संपत्ती असेल, ह्या संकल्पनेतून शिक्षण घेऊन नोकरी करावी असे लहानपणापासून वाटायचे. पण नेमकं कोणतं शिक्षण, किती शिकायचं, कोणती नोकरी, कोणतं शहर, किती पगार याबाबत कधी विचारच केला नाही. बारावीपर्यंतच शिक्षण लातूरच्या दयानंद सायन्स कॉलेज मधून विज्ञान शाखेत पुर्ण केले. चांगले गुण प्राप्त करूनसूद्धा, पुढील शिक्षण न घेता लवकरात लवकर पैसे कमवुन कुटुंबास हातभार लावावा या उद्देशाने लातूर येथील आडत मार्केटमधे भुसार दुकान चालू करण्याचे ठरवले. त्यानुसार चुलत भावाच्या भुसार दुकानावर काम शिकण्यासाठी जाऊ लागलो. सर्व काही सुरळीत चालू असतनाच अचानक एके दिवशी असे काही घडले, ज्यामुळे माझ्या जीवनाला नविन वळण भेटले. वडिलांचे मित्र व चनबसवेश्वर फार्मसी कॉलेजचे उपप्राचार्य पोस्ते सरांच्या सल्ल्यानुसार फार्मसी डिप्लोमाला प्रवेश घेतला. त्यावेळेस ठरवले की आलेल्या संधीच सोन करायच, नाहीतर परत भुसार दुकान चालवावे लागेल. याच भीतीपोटी चांगला अभ्यास केला व 83% गुण प्राप्त करून पुढील पदवी शिक्षणासाठी शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय अमरावती येथे प्रवेश मिळवला. अमरावतीला घरातून निघताना डोळ्यांमध्ये अश्रू होते, परंतु ते आई-वडिलांपासून लपवण्या इतपत शहाणपण आल होतं. अमरावती शहर तसे स्वच्छ व सुंदर शहर, स्वच्छतेचे जनक असलेल्या संत गाडगेबाबांची जन्मभूमी. मले, तूले, काय लेका यासारखे शब्द आपुलकीचे वाटायला लागले. आई, वडिल, भाऊ, बहीण आणि वहिनी यांच्या प्रेमाची उणीव भरून काढण्यासाठी जीवाला जीव देणारे मित्रही याच शहराने दिले. रंगारकर काका काकूच्या स्वरूपात आई वडिलांसारखे घरमालकही याच शहराची देन होती. पण तरीही भुसार दुकानाची भीती अजूनही मनात होतीच. पुढे याच भीतिपासुन प्रेरणा घेऊन अमरावती विद्यापीठात द्वितीय क्रमांक व गेट परीक्षेत भारतामधे 41 वा क्रमांक मिळवून मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मधे पद्युत्तर (एम. फार्म.) साठी प्रवेश मिळवला. मुंबई, राज्याची आर्थिक राजधानी, कधीही न झोपणार एक धावत शहर,  उंच इमारती, गर्दीने तुडुंब भरलेली लोकल आणि त्या लोकल मधे कसा प्रवास करावा अशी भीती मनात निर्माण झाली. परंतु कॉलेजच्या आवारात असलेल्या वसतिगृहामधे प्रवेश मिळाल्यामुळे हे धावते शहर व गर्दी असलेली लोकल यांची ओळख काही फारशी झालीच नाही. शाळेत बाईंनी काळ्या फळ्यावर लिहीलेल्या कवितेपासून ते कॉलेजात प्रोजेक्टर व लॅपटॉप यांच्या सहाय्याने शिकविणाऱ्या प्राध्यापकांपर्यंतचा हा प्रवास होता. याच मयानगरी मुंबईने दिलेली अनमोल भेट म्हणजे ‘माझा आत्मविश्वास’. याच आत्मविश्वासामुळे पुन्हा भुसार दुकानी जाण्याची भीती जणु काही पळुनच गेली होती. पुढे कॉलेज कॅम्पस प्लेसमेंट मधुन मायलन नावाच्या प्रसिद्ध औषध कंपनीमधे हैदराबाद येथे नोकरी मिळाली. हैदराबादमधे रोजच्या नाश्तामधील पोहे, उपमा यांची जागा इडली, डोसा, उत्तप्पा व सांबरने घेतली होती. तसेच जेवनामधील भाकरी व पोळीची जागा ही लेमन राइस, फ्राईड राइस, कर्ड राइस, मसालेदार रस्सम व चटण्यांनी घेतली होती. आई व वहिनीच्या हातचं न मिळणार महाराष्ट्रीयन जेवण व सणावाराची पुरणपोळी हे मधुन मधुन परराज्यात असल्याची जणू जाणीवच करून देत असे. कराची बिस्किटे, सिने अभिनेत्यांची मोठी मोठी बॅनर, हुसैनसागर तलाव, लूंबिनी पार्क, रामोजी फिल्मसिटी, चारमीनार, गोलकोंडा किल्ला या पद्धतीची हैदराबादची ओळख कायमस्वरूपी स्मरणार्थ राहील. लवकरच माझी बदली नाशिकला झाली व परत महाराष्ट्रात येण्याचा आनंद काही वेगळाच होता. पण हा आनंद काही जास्त काळ टिकू शकला नाही.हरियाणामधील गुडगाव येथील रँनबॅकसी कंपनीमधे मी रुजू झालो व परराज्याचा प्रवास पुन्हा सुरू झाला. ह्यावेळी मात्र खऱ्या परराज्यात आल्याची भावना वाटू लागली. परंतु जय-वीरु सारखी मैत्री जपणारे मित्र हे चित्रपटाच्या दुनियेबाहेर वास्तविक जीवनात पण असतात हे मला गुडगावने दाखवून दिले. लहानपणी  स्वातंत्र्य दीनानिम्मित्त लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करणारे पंतप्रधान टी.व्ही. वर बऱ्याच वेळेस पहिले होते, पण प्रत्यक्षात तेच भाषण पाहताना डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. करीअरचा वेध घेत घेत गुडगाव वरून बँगलोरला कधी आलो हे कळालच नाही. जीवनाच्या याच वळणावर पुढील प्रवासात साथ देण्यासाठी हवी असणारी जोडीदार मिळाली. आपला मुलगा ‘सरकारी अधिकारी’ व्हावा अशी माझ्या आई -वडिलांची इच्छा होती. शेवटी आई-वडिलांनी उराशी बाळगलेले हे स्वप्न पुर्ण करण्यात मी यशस्वी झालो.केंद्रिय आरोग्य मंत्रलयातील  CDSCO मधे औषध निरीक्षक या पदासाठी यूपीएससी मार्फत माझी निवड झाली व दिल्ली मुख्यालयात सध्या कार्यरत आहे.भुसार दुकानात काम करत असताना कधी स्वप्नातसुद्धा विचार आला नाही की आपल्या आयुष्याचा पुढील प्रवास हा इतका रोमांचक व उज्ज्वल असेल. केवळ मिळालेली संधी व परिश्रम यांची सांगड घालून मिळालेले हे यश आहे. या यशाच्या पायाभरणी ते शिखर उभारणीच्या कार्यात आई, वडील,  भाऊ, बहीण, वहिनी, बायको, नातेवाईक, मित्रपरिवार यांचे मोलाचे योगदान आहे. या सगळ्या प्रवासात मी विविध राज्य फिरलो आणि विविध लोकांच्या सहवासात आलो. यातून भारत हा खरच ‘विविधतेत एकता’ असलेला देश आहे हे कळून चुकले. या प्रवासात अनेक कडू-गोड आठवणींचा खजिना मला मिळाला. पण त्याचबरोबर आपल्या घरापासून दूर असल्याची खंत नेहमीच मनात बोचत असते. पण ते म्हणतात ना ‘ the show must go on’…………………..

References

  • Written and Edited by Nitin Niture, Pune, 8208469241

  • WikiNote Foundation

Tags:
Created by Vishal E on 2019/01/11 13:30
    

Tips

Jump to any page in the wiki with Ctrl+G or Meta+G.
See more shortcuts.

Need help?

If you need help with XWiki you can contact: